बौद्ध ज्ञानमिमांसा पद्धती आणि त्याची प्रासंगिकता

बौद्ध ज्ञानमिमांसा पद्धती आणि त्याची प्रासंगिकता

आचार्य महानागरत्न,

पी.एच.डी. संशोधक

पालि- प्राकृत विभाग, रा.तु.म.ना.वि. नागपूर 

प्रो. डॉ. मोहन वानखडे,

पालि- प्राकृत विभाग प्रमुख

डॉ. आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी, नागपूर

सारांश (Abstract)

            आधुनिक काळ माहिती, तंत्रज्ञान आणि व्यक्तिगत सार्वभौमत्वाचा आहे. इंटरनेट, सोसिअल मिडीया, मोबाईल ॲप अशा कितीतरी इलेक्ट्रानिक आणि छापील माध्यमातून सर्वत्र माहितीचा महापूर वाहत आहे. यात प्रत्येकजन प्रवाहित होत चालला आहे. यातील कोणती माहिती खरी आहे, कोणती भ्रामक आहे? याची शहानिशा करण्यासाठी कोणाकडे वेळ नाही, तशी चिकित्सक बुद्धि सुद्धा नाही. प्रत्येक माहिती खरी आहे, यावर विश्वास ठेऊन, त्याची मिमांसा न करता उपलब्ध माहितीच्या ओघात लहान मुले, तरूण पिढी, प्रौढ आणि वयस्कर सर्वच वहावत चालले आहेत. प्रसार माध्यमांवर पकड असणाऱ्यांनी इतिहास, चरित्रग्रंथ आणि वर्तमान घटनांना शब्दांचे, माहितींचे, घटनांचे जाळे फेकून मनोरंजन आणि ज्ञानाच्या नावाने माहितीच्या महापूरात सर्वसामान्यांना गटांगळ्या खाण्यासाठी प्रवृत्त केले आहे. हा माहितीचा प्रपंच सुलभ, हवाहवासा आणि उपयोगी वाटणारा असल्यामुळे याची शहानिशा करण्याची कोणालाच फारशी गरज भासत नाही. यामुळे सत्य शोधण्यासाठी लागणारा बुद्धिवाद आणि क्षमता भरकटलेली आहे. माहितीचे आदान-प्रदान यातील विविधता आणि मांडणी अधिकच गुंतागुतीची झाल्याने बघा, ऐका आणि विश्वास ठेवा, याच भूमिकेत सामान्य माणूस जगू लागला आहे. माहितीचा (ज्ञानाचा) तात्पुरता उपयोग करून आपले इच्छित काम पार पाडणे, एवढेच करण्याची प्रवृत्ती वाढीस लागत असल्यामुळे ज्ञानाची मिमांसा करून सत्य शोधन्याची भुमिका केवळ बुद्धिवंतापूरतीच सिमीत होत चालली आहे. माहितीचे विविध स्त्रोत विद्यमान असल्यामुळे मनुष्याला कोणतीही माहिती (ज्ञान) सहज उपलब्ध होत आहे, परंतु त्या ज्ञानाची शहानिशा करण्याची पद्धती त्याच्याकडे नसेल तर तो ज्ञानरूपी वाळवंटात भटकून जाण्याची शक्यता आहे. या समस्येचा विचार करून पारंपारिक (बौद्ध) ज्ञानमिमांसेची प्रासंगिकता या शोध-निबंधातून विषद केली जाणार आहे. परंरपरागत ज्ञानमिमांसेतील बौद्ध ज्ञानमिमांसा पद्धती आजही प्रांसगिक ठरणारी आहे, हेच याचे गृहितक असून अनेक ग्रंथाच्या संदर्भावरून ते सिद्ध केले जाणार आहे. बौद्ध ज्ञानमिमांसा आणि आधुनिक संशोधन पद्धतीची संक्षिप्त तुलना करून त्याचे महत्व, उपयोगिता आणि प्रासंगिकता निष्कर्षातून देण्यात येईल.

बीजशब्द : माहिती (ज्ञान), प्रमाण, प्रतित्य समुत्पाद, अनित्यता, सापेक्ष सत्य

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P039

Download