ग्रामीण संस्कृतीच्या संक्रमणाचे चित्रण : आनंद यादव यांच्या झोंबी या कादंबरीचा एक चिकित्सक अभ्यास
प्रा. गंगा मारोतराव मोंढे
विद्यासागर कला महाविद्यालय
खैरी (बिजेवाडा), रामटेक
तह -रामटेक जि.नागपूर (महाराष्ट्र) -४४११०६
ई-मेल : ganga.mondhe88@gmail.com
सारांश
आनंद यादव यांची झोंबी ही मराठी आत्मकथनपर साहित्याच्या परंपरेतील महत्त्वाची कृती असून तिच्या केंद्रस्थानी लेखकाच्या बालपणापासून शिक्षणासाठी केलेल्या संघर्षापर्यंतचा अनुभवविश्वाचा प्रदीर्घ पट आहे. मात्र झोंबीकडे केवळ एका व्यक्तीच्या संघर्षकथेच्या रूपाने पाहिल्यास या कादंबरीचे साहित्यिक मर्म पूर्णपणे उलगडत नाही. या कृतीतून एका विशिष्ट काळातील ग्रामीण जीवनाचे बदलते रूप, शेतीभोवती उभे राहिलेले जग, बैल आणि माणूस यांचे जिव्हाळ्याचे नाते, गावातील सण-उत्सव, तमाशा, सोंगी भजन, ओव्या, जात्याची घरघर, मौखिक परंपरा, कष्टकरी जीवन, गरिबी, अंधश्रद्धा, कुटुंबातील ताणतणाव आणि शिक्षणाची ओढ यांचे अत्यंत जिवंत चित्रण आढळते. म्हणूनच झोंबी ही एका व्यक्तीची कथा असतानाच बदलत्या ग्रामीण जगाची स्मरणकथा ठरते.
या कादंबरीत पारंपरिक ग्रामीण संस्कृती एका दिवसात नाहीशी होत नाही. तिच्या अंगावर नव्या काळाचे थर चढत जातात. शेतीच्या कामात बदल होतो, यंत्रे येतात, पिठाच्या गिरणीमुळे जात्याची घरघर थांबते, ओव्या हरवतात आणि रेडिओ गावच्या घरात प्रवेश करतो. या बदलांकडे यादव केवळ प्रगतीच्या किंवा ऱ्हासाच्या एका सरळ चौकटीतून पाहत नाहीत. उलट, नव्या जगाने काही दिले आणि काही हिरावून घेतले, ही जाणीव त्यांच्या लेखनात सतत जाणवते. “काही मिळवायचे आणि काही गमवायचे” हे सूत्र झोंबीच्या ग्रामीण संस्कृतीविषयक चिंतनाचा मध्यबिंदू ठरते.
शेती, श्रम आणि शिक्षण यांच्यातील संघर्षातून आनंदाचे व्यक्तिमत्त्व घडते. एका बाजूला मळ्यातील कामासाठी त्याची गरज आहे; दुसऱ्या बाजूला पुस्तकांच्या जगाची त्याला ओढ आहे. त्यामुळे शाळा त्याच्यासाठी केवळ शिक्षणाचे ठिकाण न राहता गावाच्या पलीकडील जगाकडे उघडणारी खिडकी बनते. झोंबीमध्ये ग्रामीण संस्कृतीचे संक्रमण म्हणून दिसणारा हा बदल केवळ बाह्य जगण्यातील बदल नाही; तो माणसाच्या आकांक्षा, स्मृती, नातेसंबंध आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टीत घडणारा बदल आहे. प्रस्तुत अभ्यासात याच बदलत्या ग्रामीण जीवनाचे साहित्यिक स्वरूप, त्यातील अंतर्विरोध आणि आनंद यादव यांच्या निवेदनशैलीतील त्याचे कलात्मक रूप यांचा चिकित्सक विचार केला आहे.
मुख्य शब्द : आनंद यादव, झोंबी, ग्रामीण संस्कृती, संक्रमण, शेती, लोकपरंपरा, ओवी, शिक्षण, ग्रामीण जीवन, सांस्कृतिक स्मृती.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2609I01VXIVP0007
Download