भारतीय तत्त्वज्ञान आयुर्वेदाचा आधार : एक चर्चा
डॉ. सुनीता इंगळे
विभागप्रमुख (निवृत्त)
तत्त्वज्ञान विभाग
रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर
सारांश:
भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय संस्कृती ही विज्ञानाची एक उज्ज्वल परंपरा आहे. अर्थात सध्याचे जग जरी वैज्ञानिक दृष्टीने अतिशय प्रगत असले तरीही प्राचीन काळी देखील मनुष्य संस्कृती ही अतिशय प्रगत असल्याचे संदर्भ प्राचीन ग्रंथामध्ये आढळून येतात . जसे गुरुत्वाकर्षण शक्तीचा विचार , भूमितीतील पायथागोरसचा सिद्धांत ई. अगदी हेच शब्द नसले तरीही ह्याविषयीची विचार आढळून येतो. यावरून लक्षात येते कि भारतीय तत्त्वज्ञान हे सर्व शास्त्रांची जननी आहे.
आयुर्वेदासारखे वैद्यकीय शास्त्राचा आधार देखील भारतीय तत्त्वज्ञानच होय. एवढेच नाही तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ह्याप्रमाणेच आयुर्वेदाला पाचवा वेद म्हणून संबोधण्यात येते. भारतीय तत्त्वज्ञानातील पंचमहाभूतांचा सिद्धांत हाच आयुर्वेदाचा आधार असून यावर संपूर्ण आयुर्वेद आधारीत आहे. या सिद्धतांनुसार विश्वातील सर्व वस्तू या पांच तत्त्वांच्या (पृथ्वी, जल,तेज, वायू आणि आकाश) विविध संयोजनातून अथवा एकत्रीकरणातून उत्पन्न झालेल्या आहेत.
त्याचप्रमाणे पाच पंचमहाभूतांच्या विविध एकत्रीकरणातून त्रिदोष (वात ,पित्त आणि कफ) निर्माण होतात, ह्यांची जेव्हा साम्यावस्था असते तेव्हा मनुष्याची प्रकृति उत्तम असते. जेव्हा या त्रिदोषांचे प्रमाण कमी अधिक झाल्यास मनुष्याची प्रकृति बिघडते. अर्थात त्रिदोषातील एका दोषाचे प्रमाण जरी कमी अथवा अधिक झाले तर अन्य दोषांमधेही असमतोल निर्माण होतो आणि मनुष्याचा प्रकृतीत बिघाड होतो. यावर उपचार करून त्या त्रिदोषांचा (वात ,पित्त ,कफ) समतोल साधता येतो. यावर उपोचार करण्यासाठी आयुर्वेदात वैद्यकीय शास्त्रांत प्रवीण असणाऱ्या वैद्यांद्वारे औषधोपचार करून घ्यावे लागतात.
औषधोपचार सोबतच काही हस्तमुद्रा करून देखील ह्या व्याधी अथवा समस्यांना थोडे फार कमी करता येते. याविषयीचा उल्लेख वैदिक काळातील प्राचीन ग्रंथांमध्ये आढळून येतो. जसे मनुष्याचे जीवन आरोग्यवर्धक होण्यासाठी मनुष्याची जीवनशैली महत्वाची असते, ज्यात मनुष्याचा आहार, विहार,व्यायाम,प्राणायाम,ध्यानधारणा आणि त्याचबरोबर हस्तमुद्रा देखील आवश्यक आहे. हस्तमुद्रा म्हणजे हाताच्या बोटांच्या विशिष्ट हालचाली. मनुष्याच्या हाताचे प्रत्येक बोट पंचमहाभूतातील एका-एका तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. त्यात दोन किंवा दोनपेक्षा जास्त बोटांच्या संयोगातून मुद्रा तयार होते आणि ती प्रत्येक मुद्रा त्या-त्या तत्त्वापासून उत्पन्न झालेल्या आणि शरीरात सर्वत्र विहार करणाऱ्या ऊर्जेचे नियंत्रण आणि नियमन केले जाते. आणि संपूर्ण शरीरात प्रवाहित केले जाते. औषधोपचारांसोबत हस्तमुद्रांही आचरणात आणल्या असता त्यांचे परिणाम अधिक विधायक ठरतात. अशाप्रकारे भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीतील प्राचीन ग्रंथामध्ये तत्त्वज्ञान, विज्ञान, वास्तुविद्या, ज्योतिषविद्या, खगोलशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, साहित्य, गणितशास्त्र, सगळ्यांचाच अभ्यास अथवा विचार प्रचुर प्रमाणात झालेला दिसून येतो.
मुख्य शब्द: पंचमहाभूत, त्रिदोष, आध्यत्मिक, मानसिक, शारीरिक, हस्तमुद्रा.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509I9VXIIIP0084
Download