गोंदिया जिल्ह्यातील ढीवर समाजाचा परंपरागत व्यवसाय, व्यवसायिक ज्ञान आणि व्यवसायात आलेले परिवर्तन
कौस्तुभ म. चुटे
समाजशास्त्र विभाग,
रा.तु.म.ना.वि,नागपूर.
सारांश
सदर संशोधन अभ्यास महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील ढीवर समाजाच्या पारंपारिक व्यवसाय, व्यवसायिक ज्ञान आणी व्यावसायिक पद्धतीतील बदलांवर लक्ष केंद्रित करते.
ढीवर समाज पारंपरीकपणे त्यांच्या उपजीविकेसाठी नद्या, तलाव आणि डबके यासारख्या जलस्त्रोतांवर अवलंबून आहे. त्यांच्या प्राथमिक व्यवसायांमध्ये मासेमारी, कमळ, शिंगाळा, पाण्यातील फळांचे संग्रह, टरबूज आणि खरबूज, पर्यटकांना बोटीवर फिरवणे आणि पाण्याशी संबंधित व्यापार समाविष्ट आहे. त्यांच्या जीवनपद्धतीतील जलपरिसंस्थेचे सखोल निरीक्षण, मासेमारीच्या ऋतूचक्रांचे ज्ञान, माश्यांच्या प्रजातींची ओळख, नैसर्गिक संसाधनाचे शाश्वत उपयोग, सामुदायिक सहकार्य आणी सामुहिक व्यवस्थापन या घटकांचा समावेश आढळतो – जे भारतीय ज्ञान परंपरेतील लोकपरंपरा, लोकज्ञान, स्थानिक पर्यावरणीय ज्ञान आणि सामुदायिक संसाधन व्यवस्थापन संकल्पना यांच्याशी घट्ट संबंधित आहे.
तथापि, अलीकडच्या दशकात आधुनिकीकरण, पर्यावरणीय ऱ्हास, धोरणात्मक बदल आणि सामाजिक-आर्थिक बदलांमुळे या पारंपारिक उपजीविकेत लक्षणीय बदल झाले आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे कि, ढीवर समाजाची तरुण पिढी रोजगार आणि शिक्षणाच्या नवीन प्रकारांशी अधिकाधिक जुळवून घेत आहे, तर पारंपारिक मासेमारी पद्धती कमी होत आहेत. कारण पारंपारिक मासेमारी करणाऱ्या पिढीला वाटते कि त्यांच्या मुलांचे भविष्य कारकीर्द बळकट होण्यासाठी त्यांनी शिक्षण करून चांगले रोजगार प्राप्त करावे. ‘आम्ही जे कष्ठ करतो ते आमच्या मुलांनी करू नये’ या विचाराखेरीज ढीवर समाजातील पालक त्यांच्या मुलांना पारंपारिक मासेमारी व्यवसाय सोडून इतर व्यवसाय किंवा नौकरी करण्याची इच्छा बाळगतात.
सदर संशोधन वर्णनात्मक आणि विश्लेषणात्मक स्वरूपाचे आहे. जे गोंदिया जिल्ह्यातील १२ कुटुंबांच्या उत्तरदात्यांच्या नमुन्यावर केले गेले आहे. मुलाखती, प्रश्नावली या प्राथमिक आणि शासकीय अहवाल व मागील संबंधित संशोधन अभ्यासांसारख्या दुय्यम स्त्रोतांद्वारे तथ्य संकलन करण्यात आले आहे. तथ्य विश्लेषणासाठी chi-square चाचणी या सांखीकीय साधनांचा वापर करण्यात आला आहे.
अभ्यासावरून असे दिसून आले आहे कि, आधुनिकीकरण तसेच नागरीकरण व जागतिकीकरणांमुळे ढीवर समाजाच्या पारंपारिक व्यावसायिक प्रणालीमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. पारंपारिक कौशल्ये आणि पर्यावरणीय ज्ञान मौल्यवान असले तरी, आर्थिक सक्ती आणि सामाजिक बदलांमुळे उपजीविकेत विविधता आली आहे.
बीजशब्द :- ढीवर समाज, गोंदिया जिल्हा, पारंपारिक व्यवसाय, आधुनिकीकरण, व्यावसायिक ज्ञान, जागतिकीकरण, उपजीविकेतील परिवर्तन, मत्स्यव्यवसाय, सामाजिक-आर्थिक विकास.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P032
Download