डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय लोकशाही
प्रा. डॉ. राजेंद्रप्रसाद टी. पटले
राज्यषास्त्र विभाग प्रमुख
कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय,
पेट्रोल पंप, जवाहरनगर, भंडारा.
मो. न.9422343684
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या महापरिनिर्वाणाच्या अगोदर दोन वर्षे आपल्या अनुयायांना उद्देशून केलेल्या भाषणात त्यांचा संघर्ष संपत्ती वा सत्तेसाठी नसून स्वातंत्र्य व मानवी कल्याणासाठी असल्याचे प्रतिपादन केले होते. ते म्हणतात, Ours is a battle not for wealth or for powers. It is a battle for freedom. It is a battle for the reclamation of human personality. यावरून त्यांची केवळ भारतीयांविषयीच नव्हे तर अखिल मानवजातीविषयीची कळकळ लक्षात येते. त्यांना मानव कल्याणासाठी स्वातंत्र्य आणि असे स्वातंत्र्य, की जे मानव कल्याण करेल असे हवे होते. त्यासाठीच त्यांचा संघर्ष होता. धर्म व जातीय भेदभावावर आधारलेले स्वातंत्र्य व त्यासाठी स्वीकारलेली लोकशाही प्रणाली चिरकाल टिकणार नाही, याची त्यांना जाणीव होती, म्हणूनच त्यांनी भारतीय समाजातील अस्पृश्यतेची व जातीयतेची कीड नष्ट करण्याचा प्रयत्न केला. डॉ. आंबेडकरांच्या राजकीय चिंतनातील लोकशाही विचार हा केवळ आदर्शाच्या स्वप्नरंजनातून उपजलेला नव्हता तर भोवतालच्या सामाजिक राजकीय वास्तवाच्या मुशीतून तो तावून सुलाखून निघाला होता. भारतात लोकशाहीची उभारणी करणे एवढयापुरते त्यांचे राजकीय ध्येय परिमित नव्हते. तर जिथे जिथे लोकशाही असेल त्या सर्वच राष्ट्रांशी सहकार्य करून भारताने लोकशाही मुल्यांचे संरक्षण करावे अशीही त्यांची इच्छा होती. सामान्य माणसावर आंबेडकरांचा एवढा लोभ आणि विश्वासही होता. की त्यांच्या व्यक्तिगत व सामूहिक प्रतिष्ठेच्या प्रतिष्ठापणेसाठी लोकशाही जिवनमार्गाचा त्यांनी ध्यास घेतला होता. ‘लोकशाही म्हणजे सहजीवन लोकशाहीची मुळे सामाजिक संबंधातच आढळतात अशी त्यांची धारणा होती.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2504I03S03V13P0003
Download