शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्तारामध्ये गिरिदुर्गांची भूमिका : एक ऐतिहासिक अध्ययन
अमितकुमार गणेश शिंगणे
संशोधक विद्यार्थी
एम.इ.एस. कॉलेज मेहकर,
जि. बुलढाणा.
प्रस्तावना –
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती मावळ प्रांतातील मावळ्यांच्या सहकार्याने सह्याद्रीचा आश्रय घेवून गिरिदुर्गामध्ये. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीपूर्वी, मुस्लिम राजवटीत आणि मुस्लिम राज्यसत्ता अस्तित्वात येण्याच्या पूर्वीच्या काळात देखील ज्या राजसत्ता अस्तित्वात होत्या त्या राजसत्तांच्या राजधान्या म्हणजे केवळ गावं होती. त्यापैकी काही गावे ही डोंगरावर, तर काही सपाट मैदानावर होती. जसे की, बदामीच्या चालुक्यांची राजधानी डोंगराजवळ होती डोंगरावर नव्हती, पण युद्धजन्य परिस्थिती किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीत त्या डोंगराचा आश्रय घेता यावा म्हणून त्यांनी तेथे आश्रयस्थान मात्र बांधले होते. राष्ट्रकुटांची पहिली राजधानी ‘मयूरखंडी’ ही नाशिक जिल्ह्यातील मार्कंडा डोंगरावर होती असे म्हणतात. राष्ट्रकुटाची दुसरी राजधानी ‘मालखंड’ ही मात्र मैदानात होती. त्यानंतर चालुक्यानी आपली राजधानी ‘कलपाणी’ (बिदरजवळची) सपाट मैदानावर होती. चालुक्यानंतर आलेल्या कलचुरी सत्ताधीशांनी ‘कल्याणी’ येथे आपली राजधानी ठेवली होती. त्यांचा पराभव करणाऱ्या यादवांनी आपली राजधानी ‘देवगिरी’ येथे उभारली होती. कोल्हापूरच्या शिलाहार राजानी आपली राजधानी ‘प्रणालकदुर्ग’ म्हणजे पन्हाळगडावर बसविलेली होती. मुस्लिम काळात बहमनी सुलतानांची प्रथम राजधानी ‘कलबर्गे (गुलबर्गा)’ त्यानंतर ‘बिदर’ येथे हलविण्यात आली. वरील दोन्ही शहरे सपाटीवर आहेत. बहमनी साम्राज्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक प्रांतात ज्या पाच शाह्या निर्माण झाल्या, त्यामध्ये एक गोवळकोंड्याची कुतुबशाही जर सोडली, तर बहुतेक राजसत्तांच्या राजधान्या डोंगरावर स्थापन केल्या गेलेल्या दिसत नाहीत. जसे विजापूरची आदिलशाही किंवा अचलपूरची इमादशाही इतकंच नाही तर खानदेशातील फरुखी सुलतानीच्या राजधान्या ‘याळणेर’ व ‘बुऱ्हाणपूर’ या सपाट मैदानावरच होत्या; परंतु शिवाजी महाराजांनी एकामागून एक स्थापन केलेल्या दोन्ही राजधान्या ‘राजगड’ व ‘रायगड’ या सह्याद्रीच्या गिरिशिखरावर होत्या हे विशेष होय.
शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या ह्या दोन्ही राजधान्या गिरीदुर्गावर होत्या. तसेच वेळोवेळी स्वराज्यावर आलेल्या संकटाचा सामना करताना गिरीदुर्गाचा आश्रय घेतला. यावरून शिवाजी महाराजांनी केलेला स्वराज्य विस्तार पाहता त्यामधील गडकिल्ल्यांची विशेषत: गिरीदुर्गाची भूमिका लक्षात येते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्तारामध्ये गिरिदुर्गांची असलेली भूमिका सविस्तर समजून घेणे हा सदर शोधनिबंधाचा मानस आहे.
बिजाशब्द –
गिरीदुर्ग, डोंगरावर बांधलेले किल्ले, मावळ, नहेर.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2408II04V12P0002
Download